कार्यक्रमाविषयी

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत युवकांना सामावून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

२१ ते २५ वर्षे वयाचे किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेचे पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. प्रतिमाह रु. ३५,००० (रुपये पस्तीस हजार) विद्यावेतन दिले जाईल. नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील किमान १ वर्षाचा अनुभव असलेले युवक या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना कार्यक्रमापश्चात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करता येईल किंवा उच्च शिक्षण घेता येईल. भविष्यातील वाटचालीसाठी या कार्यक्रमाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरेल यात शंकाच नाही.

सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना महत्त्वपूर्ण अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. युवकांमध्ये नेतृत्त्वगुण विकसीत करण्यासोबतच त्यांच्यात प्रशासकीय कामकाजाची जाण निर्माण करणे व भविष्यात सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना तयार करणे ही उद्दिष्टेही या कार्यक्रमामुळे साध्य होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनासोबत काम करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अर्थपूर्ण सहभाग घेता येणार आहे, खूप काही शिकताही येणार आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहे.


कार्यक्रमाचा उद्देश:

 • तरुण पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर युवकांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शासनासोबत काम करण्याची संधी देणे, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, समाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत व धोरण निर्मितीत त्यांना सहभागी करून घेणे.
 • शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये तरुणांचा उत्साह व त्यांच्या नवनवीन कल्पनांना सामावून घेणे.
 • विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीत सहभागी होण्याचा व यंत्रणेचा भाग बनून काम करण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव युवकांना देणे.

भविष्यातील संधी:

 • सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात आपल्या आवडीचे करिअर निवडताना या कार्यक्रमातील सहभागाचा निश्चितच उपयोग होईल. या कार्यक्रमाच्या अखेरीस मिळणारे प्रशस्तिपत्रक व्यावसायिक वाटचालीत मोलाचे असेल.
 • विकास कामांची अंमलबजावणी व प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण या कार्यक्रमामुळे प्राप्त होईल.
 • स्वत:ची संस्था सुरु करताना या अनुभवाचा लाभ होईल.
 • धोरण व प्रशासन विषयक अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेताना हा अनुभव उपयोगी पडेल.

अर्जदारांनी पुढील बाबींची नोंद घ्यावी:

 • फेलोशिप कार्यक्रमाची मुदत केवळ ११ महिने असेल
 • महाराष्ट्र शासन फेलोशिप पश्चात कोणत्याही नोकरीची हमी देत नाही
 • निवड झालेल्या उमेदवारास या कार्यक्रमादरम्यान कोणतीही इतर नोकरी वा काम करता येणार नाही.
 • कार्यक्रमादरम्यान उमेदवारास महाराष्ट्रात रहावे लागेल.
 • बाहेरील उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
 • कार्यक्रम कालावधीत दरमहा रु. ३५,००० (रुपये हजार) मानधन दिले जाईल.