संकल्पना

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश. सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमामुळे मिळेल.

२१ ते २६ वर्षे वय, कोणत्याही शाखेची प्रथम वर्ग पदवी, एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठीचे ज्ञान या निकषात बसणारा कोणीही युवक/युवती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकेल. ११ महिन्यांच्या या कार्यक्रमादरम्यान दरमहा ४०,००० रुपयांचे मानधन (रु. ३५,००० विद्यावेतन + रु. ५,००० प्रवास व अनुषंगिक खर्च) दिले जाणार आहे. उत्साही, जबाबदार व उद्यमशील युवकांचे या कार्यक्रमासाठी स्वागत आहे.

सामाजिक विकास क्षेत्रात रस असणाऱ्या युवकांना अत्यंत उपयुक्त अनुभव देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. तरुणांमधील नेतृत्त्व गुण जोपासणे, त्यांचे प्रशासनासंदर्भातील ज्ञान वृद्धिंगत करणे, भविष्यातील नेतृत्त्वाच्या मोठ्या संधींसाठी युवकांना तयार करणे यासाठी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना शासनासोबत काम करण्याची दुर्मिळ संधी मिळते. धोरण निर्मिती, अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अशा विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये फेलोजना अर्थपूर्ण सहभाग देता येतो. राज्यातील विविध नामांकीत संस्थांना भेटी तसेच उद्योग, कला, लेखन, पत्रकारिता, मनोरंजन आदी क्षेत्रातील नामवंतांच्या भेटींच्या संधीही या कार्यक्रमामुळे फेलोजना मिळतात.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा या युवकांच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरतो आहे. व्यावसायिक वाढीची संधी हा कार्यक्रम देतो. धोरण, प्रशासन, राज्यशास्त्र, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षण वा व्यावसायिक संधी या कार्यक्रमामुळे सहज साध्य होऊ शकतात.